सांगली : सांगली जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अभूतपूर्व उत्साहात पार पडल्या. सांगली पोलीस दलानेही जल्लोषात विसर्जन सोहळ्यात सहभाग घेत बंदोबस्तातील थकवा दूर केला. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी झिंगाटच्या तालावर थिरकत पोलिस दलाच्या बाप्पांना निरोप दिला.


35 तासापेक्षा अधिक काळ सुरु असणाऱ्या मिरजेच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीचा 35 तास बंदोबस्त करणाऱ्या पोलिस दलाने जल्लोष केला. यावेळी सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरत पोलिस दलाच्या गणेशाचं विसर्जन केलं. सर्वांनी एकत्रितपणे गाण्याच्या तालावर नाचत बंदोबस्तात आलेला थकवा दूर केला.

आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या आणि बंदोबस्तात मग्न असणारे पोलिस कर्मचारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. बंदोबस्त पार पडल्यानंतर वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीत नाचू लागल्याने कर्मचारी आणि अन्य अधिकाऱ्यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी चित्रपटाच्या विविध गीतांवर पोलिस दलाने आपल्या गणपतीचं विसर्जन करत मिरजेच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची सांगता केली.