Sangli News Latest Update : कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर पाणी पाजण्यासाठी नेलेल्या घोड्याला मगरीने ओढून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथे घडली आहे. अंधार पडल्याने ग्रामस्थांनी शोध आणि बचाव कार्य थांबवले. गावातील उदय मारुती मोरे यांचा पूर्ण वाढ झालेला घोडा पाणी पाजण्यासाठी मुलगा नदीच्या पाणवठ्यावर घेऊन गेला होता. घोड्याची दोरी मुलाच्या हाती होती. घोडा पाणी पित असताना अचानक मगरीने झडप मारुन पात्रात ओढून नेला. दोरी धरलेला मुलगाही मगरीने हिसका मारल्याने पाचदहा फूट फरपटत गेला. प्रकार लक्षात येताच दोरी सोडून दिली, त्यामुळे मुलगा बचावला.


त्याने आरडाओरडा करताच लोक नदीकाठी जमले. या दरम्यान मगर घोडा जबड्यात धरून फिरत होती. अंधार पडल्याने घोड्याला वाचवण्याचे प्रयत्न थांबवण्यात आले. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र घोड्याची मगरीच्या तावडीतून रात्री उशीरापर्यंत सुटका करता आलेली नव्हती.


दरम्यान, सध्या मगरीचा प्रजनन काळ असल्याने मगरी आक्रमक असण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांनी पाणवठ्यावर सावधगिरी बाळगावी असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील आणि वन विभागाने केले आहे.