Sangli Crime: सांगली शहरात खुनाच्या घटनांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.शहरातील इनाम धामणी रोडवर रात्री एका बाप-लेकावर हल्ला करत मुलाच्या सामोरंचं बापाला दगडाने ठेचून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कीर्ती कुमार शेडबाळे (वय 50) असं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर हल्ल्यामध्ये मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावाने पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातुन खून झाला,हे स्पष्ट होऊ शकले नाही.
Sangli Crime: नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती कुमार शेडबाळे हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणी परिसरातील कच्च्या रस्त्यावरून जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन संशयित व्यक्तींशी त्यांचा किरकोळ वाद झाला. हा वाद क्षणातच विकोपाला गेला. संतप्त झालेल्या संशयितांनी बाप लेकवर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात कीर्ती कुमार शेडबाळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जागीच ठार मारण्यात आले, तर मुलालाही मारहाण करण्यात आली. वडिलांचा खून मुलाच्या समोरच झाल्याने ही परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पळून जाणाऱ्या हल्लेखोरांना स्थानिकांचा बेदम चोप
घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित हल्लेखोरांना स्थानिक नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमका वाद कशावरून झाला आणि हल्ल्यामागचं कारण काय होतं, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. सांगलीत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
