Sangli Crime News : आयकर अधिकारी (Income Tax officer) असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना (Police) यश आलं आहे. या गुन्ह्यातील आतापर्यंत तीन आरोपी जेरबंद झाले आहेत. या गुन्ह्यात एकूण सात आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तर पोलीस बाकी आरोपीच्या मागावर आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. दिक्षा राष्ट्रपाल भोसले वय-25 वर्षे राहणार-काकडे पार्क, बिल्डिंग नं. एफ-1, चिंचवड, पुणे, पार्थ महेश मोहिते वय-25 वर्षे राहणार-मंगळवार पेठ, कोल्हापूर, साई दिपक मोहिते वय-23 वर्षे राहणार-प्रगतीनगर, पांचगाव ता-करवीर जि-कोल्हापूर ही अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर महेश रघुनाथ शिंदे राहणार-जयसिंगपूर जि-कोल्हापूर सध्या राहणार- घाटकोपर, मुंबई, अक्षय लोहार राहणार-संकेश्वर जि-बेळगाव राज्य-कर्नाटक , शकील पटेल राहणार-गडहिंग्लज जि-कोल्हापूर, आदित्य मोरे राहणार-रुकडी ता-हातकणंगले जि-कोल्हापूर हे चौघेजण अद्याप फरार आहेत. या चौघांना पकडण्यासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मागावर आहेत.
आयकर विभागाचा छापा असल्याचे बनाव करून मुद्देमाल लंपास
कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा असल्याचे बनाव करून तोतया आयकर अधिकाऱ्यांनी किलोभर सोन्याचे दागिने आणि रोकड असा 1 कोटी 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. हिंदी चित्रपटातील स्पेशल 26 सारखा हुबेहूब छापा कवठेमहांकाळ मधील गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर टाकण्यात आला होता. यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि कवठेमहांकाळ पोलीस तपास करीत होते. त्यानुसार पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील एका तरुणीसह चौघांना कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतील घाटकोपर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान तोतया आयकर अधिकारी असणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली असून अन्य तिघांकडे चौकशी करण्यात येत आहे. तसेच डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरातून चोरीस गेलेली रोकड आणि सर्व सोन्याचे दागिनेही तोतया अधिकाऱ्यांकडून परत मिळाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सांगलीमध्ये अशा प्रकारचा प्रथमच छापा पडला होता. परंतु त्याचा छडा लावण्यामध्ये मात्र आता सांगली पोलिसांना आलं आहे.
महत्वाच्या बातम्या: