सांगली : सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीवरून भाजपा खासदार संजयकाका पाटील प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. सांगली जिल्ह्यात उपचाराविना रोज रुग्ण मरत आहेत, असा आरोप करत प्रशासनाच्या अनागोंदी कारभार विरोधात मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा भाजप खासदार संजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी हे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप सुद्धा केला आहे.


सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ कायम आहे. एकीकडे रुग्ण वाढत आहेत आणि दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्येही वाढ सुरूच आहे. शिवाय कोरोना नसलेल्या पण इतर आजार असलेले रुग्ण सुद्धा उपचाराविना रोज मरत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सांगली जिल्ह्याचा मृत्यू दर राज्याच्या दुप्पट असल्याचे जाहीर करत प्रशासनाची कानउघाडणी केली होती. मात्र तरीही जिल्ह्यातील कोरोना व उपचार पद्धतीवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे.


बेड आणि वेळेत उपचार मिळत नसल्याने इतर रुग्णांच्या मृत्यू संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे, यामुळे जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता मृत्यूच्या छायेखाली जगत,असल्याचे मत सांगली जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी केले आहेत. खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर निशाणा साधला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना आणि मृत्यूचा परिस्थिती हाताबाहेर निघाली आहे, अनेक रुग्णांना उपचाराविना मरावे लागत आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य रुग्णांची सुद्धा मोठी फरफट सुरू असून कोरोना नसलेल्या रुग्णांना सुद्धा वेळेत उपचार आणि बेड मिळत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे आणि ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई-पुणे व बाहेरच्या ठिकाण असणारी अतिरिक्त डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना पाचारण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कोरोना रुग्णालय निर्माण होणे गरजेचे आहे, मात्र याउलट प्रशासनाचा कारभार सुरू असल्याची टीका खासदार पाटील यांनी केली आहे.


जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि प्रशासनाकडे वारंवार कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत आपण सूचना करत आहोत, मात्र जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा आरोपही खासदार पाटील यांनी केला आहे. तसेच सध्या जिल्ह्यातला आरोग्य बाबतीत प्रशासनाचा सुरू असलेला अनागोंदी कारभार, येत्या काही दिवसात सुधारला नाही आणि रुग्णांचा मृत्यू असाच सुरू राहिला तर आपण स्वतः मृतदेह घेऊन सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू,असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह प्रशासनाला दिला आहे.


सांगली जिल्ह्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर चालली आहे. लोक भयभीत झाले आहेत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. आठ - आठ तास रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळत नाही. ही स्थिती जर दोन दिवसांत सुधारली नाही तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे मृतदेह घेऊन आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बसावे लागेल, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिला.


जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शासकीय यंत्रणेला कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. कोरोना काळात यंत्रणेकडून गतीने काम होत नाही. रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना आठ - आठ तास फिरावे लागत आहे. कोरोना विरोधातील लढ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांना सामावून घेणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. त्याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करणे आवश्यक आहे. मात्र हे न झाल्याने सांगली, मिरजेतील रुग्णालयांवर ताण येत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. जनता भयभीत झाली आहे. ही परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. मुंबईतील कोरोना आटोक्यात आला आहे. त्यामुळे तेथील डॉक्टर, सिस्टर, ब्रदर व इतर स्टाफ बोलावून घ्या. पण, येत्या दोन दिवसांत ही स्थिती सुधारली पाहिजे असा इशारा पाटील यांनी दिलाय.


कोरोना रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक संख्या नोंद

सांगली जिल्ह्यात गुरुवारी कोरोना रुग्ण आणि मृत्यूची रेकॉर्ड ब्रेक संख्या नोंद झाली आहे.दिवसभरात तब्बल 527 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी तब्बल 302 रुग्ण हे सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत, ज्यामध्ये 198 सांगली शहरातील तर 104 हे मिरज शहरातील आहेत. तर 238 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या कोरोना रुग्णांच्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना संख्या ही 3 हजार 481 तर आज पर्यंतचा एकूण आकडा हा 9 हजार 941 झाली आहे ,तर आता पर्यंत 6 हजार 48 कोरोना मुक्त, आणि आज अखेर 412 जणांचा मृत्यु झाला आहे ,तसेच 477 जण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत