सांगली : भारतीय सैन्य दलात भरती होणे ही अभिमानाची आणि गौरवाची बाब असते, गावखेड्यातील कित्येक पोरं आजही सैन्याचा गणवेश आपल्या खांद्यावर चढावा, यासाठी दिवसरात्र मेहनत घेत भरतीची तयारी करतात. मात्र, सैन्य दलात लेफ्टनंट पदावर भरती झालेल्या एका तरुण जवानास वीरमरण (Martyr) आल्याची दु:खद घटना समोर आली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्याच्या पलूस गावचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांची भारतीय सैन्य दलात अवघ्या 26 व्या वर्षी लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. देशसेवेत कार्यरत असलेल्या या जवानास श्रद्धांजली वाहण्याचा दु:खद प्रसंग सैन्य दलावर आणि ग्रामस्थांवर आल्याने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. विशेष म्हणजे आयटी कंपनीतील नोकरी सोडून ते सैन्य दलात (Indiam army) भरती झाले होते.
लेफ्टनंट अथर्व कुंभार हे सैन्य दलात लेफ्टनंट पदावर भरती झाल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान 20 किमी रनिंगचा अंतिम टप्पा पूर्ण करत असताना त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. लेफ्टनंट अथर्व कुंभार यांच्या आकस्मिक दुःखद निधनामुळे कुंडल,पलूसह आपल्या पंचक्रोशीवर शोककळा पसरली असून आज भारत माता की जय.. वीर जवान तुझे सलाम.. अशा घोषणा देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
2 वर्षे आयटी कंपनीत केली नोकरी
अथर्व यांचा जन्म 22 ऑगस्ट 1999 रोजी झाला असून त्यांचे शालेय शिक्षण किर्लोस्करवाडीतील किर्लोस्कर हायस्कूल येथे झाले होते. आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय येथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर, इन्फोसिस या आयटी कंपनीत दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले. त्यात, थेट लेफ्टनंट पदावर त्यांची भरती झाली होती, त्यानंतर 3 महिन्यांपूर्वीच बिहारमधील गया येथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये लेफ्टनंट पदासाठी त्यांचे ट्रेनिंग सुरू झाले होते. मात्र, प्रशिक्षणादरम्यान उष्माघाताने अर्थव यांना वीरमरण आल्याची माहिती आहे.
ग्रामस्थांकडून अखेरचा निरोप
अथर्व यांना अकाली वीरमरण आल्ने कुंभार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्यामागे आई, वडील, एक भाऊ, दोन चुलते असा परिवार आहे. बिहार येथून आज त्यांच्या पलूस या गावी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर, त्यांच्या घरापासून मुख्य बाजारपेठ, जुना बस स्थानक, नवीन बस स्थानकापासून स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी, भारत माता की जय.. वीर जवान तुझे सलाम.. अशा घोषणांनी भूमिपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.
विश्वजीत कदम यांच्याकडून श्रद्धांजली
आपल्या पलूसचे सुपुत्र अथर्व कुंभार यांचं भारतीय सैन्यातील लेफ्टनंट पदावर सिलेक्शण झाले होते आणि त्याचं ट्रेनिंग बिहार येथे सुरु असताना प्रशिक्षणादरम्यान हिट स्ट्रोक मुळे त्यांचे दुःखद निधन झाले. कुंभार कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी फेसबुक पोस्ट आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे.