Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड या एकाच व्यक्तीमुळे दोन समाजांमध्ये दरी निर्माण झाली आहे. कुठेही खोटे गुन्हे दाखल केले जातात. हे कुठेतरी बंद झाले पाहिजे, अशी विनंती आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज विधानसभेत केली. क्षीरसागर यांनी डोळ्यात पाणी आणत बीड जिल्ह्यामधील भयावह प्रकार सांगितला. बीड जिल्ह्यात झालेल्या या निर्घृण हत्येची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी सुद्धा क्षीरसागर यांनी केली. सरकारकडून बीड जिल्ह्यातील या निर्घृण हत्येबाबत काय निर्णय केला जातो? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात एमआयडीसी आणि इंडस्ट्रीज काढल्या तर सगळे दोन नंबरचे धंदे बंद होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 


तर बीडमध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही


क्षीरसागर म्हणाले की, त्या सरपंचाच्या गावात मी गेलो तेव्हा गावकरी म्हणाले न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस स्थानक पेटवून देऊ. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही. लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. कायदा-सुव्यवस्था सांभाळणं अवघड होऊन जाईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. 






302 च्या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड  


संदीप क्षीरसागर म्हणाले की, वाल्मिक कराडवर खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच, 302 च्या घटनेचा मास्टरमाईंडसुद्धा हाच व्यक्ती आहे. त्यामुळे कटकारस्थान म्हणून यात त्याचे नाव यायला हवे आणि अधिवेशन संपण्याआधी त्याला अटक झाली पाहिजे, अशा मागण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी सरकारकडे केल्या.क्षीरसागर यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीज नसल्यामुळे गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे, त्याला आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पाऊलं उचलावीत. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्र व बीड जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण प्रचंड वाढली असल्याचे ते म्हणाले.  


तर या हत्येचे संपूर्ण गणित आपल्यासमोर येईल


क्षीरसागर यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा ओहापोह करताना 6, 9 आणि 11 तारखेला काही भांडणं झाली. त्यानंतर संतोष देशमुख यांचे अपहरण झाले असल्याचे वारंवार सांगूनही त्याची तक्रार पोलिसांकडून गांभीर्याने घेतली गेली नाही, त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली. वाल्मिक कराडचे 6, 9 आणि 11 तारखेचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासले तर या हत्येचे संपूर्ण गणित आपल्यासमोर येईल, असे ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या