उपविभागीय अधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 14 Nov 2018 11:36 PM (IST)
हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर अवैध वाळू उपसा करणारे पळून गेले. सुदैवाने या हल्ल्यात प्रशांत खेडेकर यांना इजा झाली नाही. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात वाळू माफियाने कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या गाडीवर ट्रॅक्टर चढवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रशांत खेडेकर हे जिल्हाधिकारी यांच्या अवैध गौण खनिज विरोधी पथकात काम करत होते, त्यावेळी ही घटना घडली. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी हिंगोली शहरातील खटकाळी बायपास वर अवैध वाळू वाहतूक करणारा वाळूचा ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर चालकाने त्याचे ट्रॅक्टर न थांबवता चक्क प्रशांत खेडेकर यांच्या वाहनावर चढवला. प्रशांत खेडेकर ज्या वाहनात बसले होते त्या शासकीय वाहनाला मागून ट्रॅक्टरची धडक देण्यात आली ही धडक इतकी जोरात होती की शासकीय वाहनाचे मागचे भागाचा चुराडा झाला. इतकेच नाही तर आरोपीने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटीही केली. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर अवैध वाळू उपसा करणारे पळून गेले. सुदैवाने या हल्ल्यात प्रशांत खेडेकर यांना इजा झाली नाही. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पोलीस करत असून, वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे