मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या महामार्गापैकी एक असलेल्या मुंबई ते नागपूर शहरे जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन तीन महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्ण होण्याची डेडलाईन डिसेंबर 2023 वरून मार्च 2024 होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


सह्याद्री पर्वत रंगातील टप्पा 15 आणि टप्पा 16 चे काम अजून बरेच बाकी असून या भागात बराच चढ-उतार असल्याने या रस्त्यासाठी अजून वेळ लागण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात ब्लास्टिंगचे काम नियमित होत नसल्याने हे काम डिसेंबर 2023 पर्यंत होणार नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. 


टप्पा 15 अंतर्गत वशाला ते भिरवाडी हे 28 किलोमीटरचे अंतर आहे आणि टप्पा 16 मध्ये भिरवाडी ते आमने (ठाणे) हे 37 किलोमीटरचे अंतर आहे. या भागातील जमीन अधिग्रहणमध्ये अडचणी आल्याने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून कामाची  सुरवात करायला नोव्हेंबर 2018 ची वाट पाहावी लागली होती. त्यामुळे या भागात समृद्धी महामार्गाचे काम रेंगाळले असून राज्य सरकार लोकसभा निवडणुकीच्या आधी समृद्धी प्रकल्प पूर्ण करण्याच्या आटोकाट प्रयत्नात आहे. 


नागपूर ते शिर्डी टप्पा सुरू 


मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.  शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.


शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.  मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील डिसेंबर 2022 ला नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानुसार शिर्डी ते भरवीर अशा 80 किमीच्या महामार्गाचे काम जवळपास झाले आहे.


पुढल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागण्याआधी समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. तर ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्याच्या आधी जनतेसाठी हा संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा सरकारचा मानस असल्याची चर्चा आहे. 


ही बातमी वाचा: