Samruddhi Mahamarg Potholes : मृत्यूचा सापळा ठरत असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गांवर जीवघेणा खड्डा (Potholes) पडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे लोहोगाव पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महामार्गालाच भगदाड पडल्याने समृद्धी महामार्गांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
समृद्धी महामार्गांवर जीवघेणा खड्डा
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ज्यावेळी या रस्त्याचे काँक्रिट खाली पडले. त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते. तेव्हा पुलाचा काही भाग कोसळला मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरु होऊन जेमतेम एक वर्ष होऊन गेलं. 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
समृद्धीमार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लवकरच उद्घाटन
एकीकडे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दुसरीकडे समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन लवकरच होणार आहे. याच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरली असून 4 मार्चला या महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) ते उपराजधानी नागपूर (Nagpur) या दरम्यान हा महामार्ग तयार होत असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालेलं असून आता भरवीर ते इगतपुरी असा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. समृध्दी महामार्गाचा तिसरा टप्पा हा भरवीर ते इगतपुरी असा असणार आहे. हा महामार्ग 4 मार्च पासून वापरात येणार असल्याची माहिती आहे.
भरवीर ते इगतपुरी असा तिसरा टप्पा
भरविर ते इगतपुरी हा 23 किलोमीटरचा टप्पा आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा असून डिसेंबर 2022 मध्ये त्यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी 520 किमीचा महामार्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर शिर्डी ते भरवीर पर्यंत हा महामार्ग सुरू करून एकूण 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सुरू आहे.
पाहा व्हिडीओ : Amravati Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भला मोठा खड्डा
महत्त्वाच्या इतर बातम्या :