सांगली : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची जर राजकारण्यांच्या पोटात तिडीक असती, तर ते स्मारक पाच ते सहा महिन्यात उभं राहिलं असतं, असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम माझ्याकडे द्यावं, राजकारण्यांना घेरी येईल अशा गतिमानतेनं स्मारक उभारुन दाखवेन, असं आव्हान देखील त्यांनी सरकारला दिलं.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 32 मण वजनाचे सुवर्ण सिंहासन रायगडावर उभे करण्याचा निर्णय शिवप्रतिष्ठानने घेतला आहे. त्याची सुरुवात करण्यासाठी येत्या 4 जून रोजी किल्ले रायगडावर संकल्प सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती देखील भिडे गुरुजींनी यावेळी दिली. शिवाय, हे सुवर्ण सिंहासन लवकरच तयार करण्याचा मानस असून यासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सरकारच्या दारात जाणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितलं.