Anil Parab Dapoli Sai Resort : आरोपांवर आरोप केले जातात मात्र आरोपपत्रामध्ये नावच नाही. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात (Dapoli Sai Resort Case) नुकतेच आरोपपत्र सादर केले आणि यातील महत्त्वाची बाब म्हणजे या आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा उल्लेख नाही. ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला होता. पण ज्याप्रमाणे आरोप केले जात होते, त्याप्रमाणे आता तपासात परब यांचा सहभाग आढळला नाही किंवा त्यांच्याविरोधात काही पुरावे सापडले नाहीत का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 


अनिल परब हे एकटेच असे नेते नाहीत ज्यांच्यावर आरोप करण्यात आले. यापूर्वी अजित पवार यांच्यावर सुद्धा असे आरोप केले होते. पण मात्र आरोपपत्रामध्ये त्यांचंही नाव नव्हतं. त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही यापूर्वी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांच्या बँक खात्यात फक्त एक कोटी सापडले आणि वसुलीचे आरोप खोटे ठरले. मात्र या केलेल्या आरोपांमुळे एखाद्याची बदनामी तर होतेच पण त्याचं नुकसान सुद्धा होतं. यासंदर्भात अनिल परब यांनी कोर्टात दावा करत हे आरोप खोटे असून आपल्या बदनामीसाठी केल्याचा उल्लेख केला होता.


ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करु शकते


अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. यात उद्योजक सदानंद कदम, दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे आणि इतर चार जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र आरोपपत्रात माजी मंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांचा उल्लेख नाही. अनिल पबर यांनी बेकायदेशीररित्या साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप ईडीने केला होता. परंतु आरोपपत्रात मात्र अनिल परब यांचा उल्लेख केलेला नाही. दरम्यान आमचा तपास सुरु असून या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करु शकतो, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.


तपास अजूनही सुरु : ईडी


यावर्षी मार्च महिन्यात न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान ईडीने सदानंद कदम यांची कोठडी मागितली होती. साई रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालं आणि हे रिसॉर्ट अनिल परब यांनी सदानं कदम यांना विकले होते, असा दावा त्यावेळी ईडीने केला होता. तर या प्रकरणात ईडीने अनेक वेळा अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु आपला त्या जमिनीशी किंवा रिसॉर्टशी कोणताही संबंध नाही, असा दावा अनिल परब यांनी सातत्याने केला होता.


दरम्यान आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परब यांचा उल्लेख नसण्याबाबत ईडी अधिकाऱ्यांना विचारलं असता, तपास अजूनही सुरुच असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.


अनिल परब


अनिल परब यांच्याबाबत तपासयंत्रणेची सावध भूमिका


याप्रकरणात जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. 


देशपांडे आणि कदम यांच्यासह सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे 


या प्रकरणात तपास अद्यापही सुरु असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे


अजित पवार


तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही एका प्रकरणातील आरोपपत्रात नाव नाही.


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या कथित लिलावाशी संबंधित ईडीने आरोपपत्र दाखल केले आणि त्या गुरु कमोडिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि योगेश बागरेचा सीए यांचे नाव होते.


हा कारखाना त्यांच्या कुटुंबाशी संबंधित असला तरी त्यात अजित पवार यांचे नाव नाही.


या प्रकरणातही तपास सुरु असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.


अनिल देशमुख


- त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप देखील सिद्ध झाले नाहीत


- अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आले 


- या प्रकरणाचा तपास करत तपास यंत्रणांनी त्यांना अटक सुद्धा केली 


- मात्र ते शंभर कोटीचे त्यांच्यावर आरोप केले होते ते सिद्ध झाले नाहीत 


- कारण त्यांच्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये फक्त सव्वा कोटी रुपये सापडले होते मग केलेल्या आरोपांप्रमाणे 100 कोटी रुपये अखेर गेले कुठे असा प्रश्न आहे 


आता जरी अनिल परब किंवा अजित पवार यांचा नावाचा उल्लेख आरोपपत्रात नसला तरी ईडीला पुढे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची मुभा आहे. त्यामुळे ईडी पुरवणी आरोपपत्रात अनिल परब आणि अजित पवार यांचा नावाचा उल्लेख करतील का किंवा त्यांना क्लीन चिट दिली जाईल हे पाहावं लागेल.


VIDEO : Sai Resort Case Chargesheet : साई रिसॉर्टच्या आरोपपत्रात अनिल परब यांचं नावच नाही, ईडीकडून दिलासा?