cycling : ठाणे परिसरांत जलपरी म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली अवघ्या १० वर्षांची चिमुकली सई आशिष पाटील हिने काश्मिर ते कन्याकुमारी या सुमारे 4 हजार कि.मी.चा सायकल प्रवासाला १४ डिसेंबरला सुरुवात केली होती. तिने काश्मिर मधील कटरा येथील पवित्र श्रीवैष्णोदेवीच्या प्रवेशव्दारापासून प्रारंभ करून जम्मू, अमृतसर, अटारी बॉर्डर, जोधपूर, अहमदाबाद, वडोदरा, डहाणू, चिंचोटी, घोडबंदर रोड ते बाळकुम असा सुमारे २००० कि.मी. प्रवासाचा पहिला टप्पा केवळ वीस दिवस या विक्रमी वेळांत पूर्ण केला आहे. पुढील २००० कि.मी. च्या प्रवासास ती सज्ज झाली आहे. तिच्या सोबत तिचे वडील आशिष नामदेव पाटील हे देखील स्वतः सायकल चालवून तिला प्रोत्साहन देत आहेत.
आज त्यांचे बाळकुम नगरीत प्रवेश होताच बॅण्ड वाजवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी तिचे आरती करून औक्षण केले. बाळकुम व परिसरांतील शेकडो नागरीक विशेषत लहान मुले यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी तिची आई, नातेवाईक, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर आणि स्थायी समिती सभापती संजय भोईर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. सई आशिष पाटील हिचा विश्वविक्रमाकडे जाण्याचा दुसरा महत्वपूर्ण असा सुमारे २००० कि.मी.चा टप्पा ३ जानेवारी पासून सुरू होत आहे. हा सायकल प्रवास कळवा, खारीगांव, मुंब्रा, कळंबोली, पुणे, सातारा, कोल्हापूर, केरळ, तामिळनाडू, मदुराई ते कन्याकुमारी असा असणार आहे. जलपरी आणि हवाईपरी सई पाटील या विश्वविक्रमी सायकल प्रवासा दरम्यान मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा, झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा! सायकलचा वापर करा असे विविध संदेश देत आहे. यावेळी सई पाटील हिने सांगितले की, मी काश्मिर ते कन्याकुमारी हा सुमारे ४००० कि.मी. चा सायकल प्रवास आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाच्या बळावर विक्रमी वेळांत निश्चितच पूर्ण करून एक वेगळाच विश्वविक्रम प्रस्थापित करेन.