औरंगाबाद : रयत क्रांती संघटना आपल्या सर्व जिल्हा आणि तालुका कार्यकारणी समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीवरून एक नवा पक्ष काढण्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी औरंगाबादमध्ये केली आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि राजकारणापासून अलिप्त राहणाऱ्यांनाही राजकारणात आणण्यासाठी हा नवा पक्ष काढणार आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले.


मुंबईत एप्रिल महिन्यात पक्षाचं पाहिलं अधिवेशन असणार आहे. यामध्ये पक्षाचा झेंडा आणि नाव जनतेने सुचवावं असं आवाहन यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलं. औरंगाबादेत आज रयत क्रांती संघटनेचा कार्यकर्ता मेळावा झाला, त्यात त्यांनी ही घोषणा केली. 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौरा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मेळावा घेण्यात येईल. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी कार्यकर्त्यांना अभ्यासासाठी देण्यात येतील आणि शेतकऱ्यासाठी पुन्हा जोमाने काम करणार असल्याचं सदाभाऊ यांनी सांगितलं.


भाजपने केलेली कर्जमाफी सरसकट होणं गरजेची होती, असा माझा आग्रह होता. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी सरसकट हवी, निकषावर नको. भाजपने दीड लाख कर्जमाफी केली, तिथेही शेतकरी वंचित राहिला होता आणि आताही शेतकरी वंचित राहिला, असंही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.