शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता हे बुडबुडेच, खडसेंवर 'सामना'स्त्र
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2016 02:23 AM (IST)
मुंबई : एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे आपल्याला आनंद झालेला नाही असं सांगणाऱ्या शिवसेनेने आज मात्र 'सामना' या आपल्या मुखपत्रातून खडसेंवर ताशेरे ओढले आहेत. शिवसेनाद्वेषातून मिळवलेली सत्ता म्हणजे बुडबुडेच ठरतात. बुडबुडे फुटू लागले आहेत, अशा बोचरी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. शिवसेनेबरोबर युती तोडण्याचा निर्णय आपणच कसा हिमतीने कळवल्याचा अभिमान खडसेंच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण जे शिवसेनेच्या वाटेला गेले ते एकतर आडवे झाले किंवा तुरुंगात गेले असं म्हणत शिवसेनेने खडसेंवर टीकेचे बाण सोडले. 'या कालच्या पोराला म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय कळतेय! मी म्हणजेच सरकार असे जळगावच्या नाथाभाऊंना वाटत होते. पण या कालच्या पोराने फटाक्यात दारू कधी ठासली ते समजलेच नाही.' अशा कानपिचक्याही सामनातून देण्यात आल्या आहेत. कर्म नासलं की फळही नासतं अशा बोचऱ्या शब्दात खडसेंवर टीका करत शिवसेनेने आगामी काळात हा संघर्ष वाढणार असल्याचेच संकेत दिले आहेत.