Saamana Editorial on Palghar Sadhu: डहाणूतील गडचिंचले गावात चिन्मयानंद स्वामी आणि स्वामी सुशीलगिरी महाराज या दोन साधूंची हत्या झाली. भाजप नेत्यांनी त्यावेळी "पालघरमधील साधू हत्याकांडाने हिंदुत्वाला धक्का बसला" अशी 'बालिश विधाने' केली होती. ज्या काशीनाथ चौधरींना फाशी द्यावी अशी मागणी भाजपने केली होती, त्याच मुख्य आरोपीला भाजपने आपल्या ‘वॉशिंग मशीनमध्ये’ टाकून 'स्वच्छ' केले आणि पक्षात प्रवेश दिला, या अचाट कार्यासाठी फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करायला हवा, अशा शब्दात सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

भाजपची नीयत सडकी 

या नीचपणासाठी मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागून प्रायश्चित्त घ्यायला हवे. हा विषय काशीनाथ चौधरींचा नसून भाजपची नीयत किती सडकी आहे याचा आहे. अग्रलेखाने प्रश्न विचारला आहे की, पक्ष मजबूत करण्यासाठी भाजप आणखी किती खुन्यांना, दहशतवाद्यांना, आर्थिक गुन्हेगारांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घुसळून बाहेर काढणार आहे? भाजप म्हणजे हिंदुत्वाला लागलेला 'खोडकिडा' असून पालघरचे मृत साधू भाजपला शापच देतील, अशा शब्दात हल्लाबोल करण्यात आला आहे. 

संपूर्ण खटलाच जमीनदोस्त होणार नाही काय? 

आरोपी क्रमांक एकलाच पक्षात प्रवेश दिल्याने संपूर्ण खटलाच जमीनदोस्त होणार नाही काय? हा सगळा प्रकार म्हणजे कायद्याची व सत्तेची मनमानी आहे. फाशीच्या गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन निर्दोष सिद्ध करायचे, हा नवा पायंडा घातक आहे. सर्व खुनी, दरोडेखोरांना, भ्रष्टाचाऱ्यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊन त्यांचा पक्ष ‘मजबूत’ आणि ‘पवित्र’ केला आहे, असा हल्लाबोलही करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

दिल्लीपासून काशीपर्यंत भोंगे वाजू लागले 

सामनातून म्हटलं आहे की, भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. दिल्लीपासून काशीपर्यंत भोंगे वाजू लागले की महाराष्ट्रातील 'ठाकरे' सरकारने साधू हत्याकांड केले.भाजपने मोर्चे आणि आंदोलने सुरू केली, तसेच महाविकास आघाडीचे सरकार हिंदुविरोधी असल्याचा तांडवी नाच ठिकठिकाणी केला. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी साधू हत्येबद्दल छाती पिटण्याचा जाहीर कार्यक्रम केला. भाजपने या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार काशीनाथ चौधरी यांना फाशी देण्याची मागणी केली होती. ज्या काशीनाथ चौधरींना फाशी द्यावी अशी मागणी भाजपने केली होती, त्याच मुख्य आरोपीला भाजपने आपल्या ‘वॉशिंग मशीनमध्ये’ टाकून 'स्वच्छ' केले आणि पक्षात प्रवेश दिला. भाजपचे खासदार हेमंत सावरा यांनी आरोपीच्या प्रवेशासाठी पायघड्याच अंथरल्या. हे कृत्य म्हणजे भाजपचे 'नीच राजकारण' आहे. 

साधू गेले जिवानीशी, पण आमचे राजकारण आम्ही करणार

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, हा प्रकार राजकीय स्वार्थासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, याचे उदाहरण आहे."साधू गेले जिवानीशी, पण आमचे राजकारण आम्ही करणार". काशीनाथ चौधरी यांनी यापूर्वी विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेकडे मागणी केली होती, पण साधू हत्याकांडाचा ठपका असल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता, त्यांनी हिंदू म्हणून ती भूमिका घेतली. सर्वत्र बोंबाबोंब झाल्याने चौधरी यांच्या भाजप प्रवेशास तात्पुरती स्थगिती देण्यात आली, पण भाजपची बेअब्रू झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या