Hasan Mushrif on Kirit Somaiya's allegations : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर तत्काळ पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीप यांनी किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. 


हसन मुश्रीफ म्हणाले की, "माझ्या पक्षांच्या विरुद्ध आणि आमच्या नेत्यांच्या विरुद्ध बिनबुडाचे खोटे आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्या यांच्या CA च्या पदवीवर संशय येतोय. माझ्या घरावर आणि कारखान्यावर इनकम टॅक्सची धाड पडली होती, त्यावेळी त्यांना काहीही सापडलं नव्हतं. किरीट सोमय्यांना बिचाऱ्यांना काहीही माहिती नाही. बहुतेक चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीही तरी चुकीची माहिती दिली असेल. वास्तविक त्यांनी माहिती घ्यायला हवी होती. ते जर आले असते तर त्यांना स्पष्टपणे कळालं असतं, खरं काय आहे."


"मी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा फौजदारी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. हा माझा सातवा खटला असेल. माझ्या 17 वर्षांच्या कार्यकाळात एकही आरोप झाले नाहीत.", असंही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. 


मुश्रीफ यांनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचा, किरीट सोमय्यांचा दावा


ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यानं केलेल्या घोटाळ्याचा पाढा माध्यमांसमोर वाचणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं होतं. आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचं नाव जाहीर केलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 


माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकारच्या डर्टी 11 संघामध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. मी आणखी एका नेत्याचं नाव यात वाढवत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव मी या संघामध्ये वाढवत आहे. हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. 2700 पानांची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे."


"ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपनी आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढत असताना, या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांतून दिसून येतेय.", अशी माहितीही किरीट सोमय्यांनी दिली आहे.