Kirit Somaiya Allegations on Hasan Mushrif : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यानं केलेल्या घोटाळ्याचा पाढा माध्यमांसमोर वाचणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं होतं. आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचं नाव जाहीर केलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 


माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकारच्या डर्टी 11 संघामध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. मी आणखी एका नेत्याचं नाव यात वाढवत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुशरीफ यांचं नाव मी या संघामध्ये वाढवत आहे. हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. 2700 पानांची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे."


"ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपनी आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढत असताना, या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांतून दिसून येतेय.", अशी माहितीही किरीट सोमय्यांनी दिली आहे. 


"हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी यावेळी केला. सीआरएम सिस्टम या कंपनीकडून 2 कोटींचे तर मरुभूमी फायनान्स कंपनीकडून 3.85 कोटींचे कर्ज घेतल्याचं दिसून येत आहे.", असंही किरीट सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केलंय.


किरीट सोमय्यांनी यावेळी आरोप केलाय की, "निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नाविद मुश्रीफ यांनी सीआरएम सिस्टीम आणि मरुभूमी फायनान्स कंपनीकडून 5.85 कोटींचं कर्ज घेतलं. या दोन्ही कंपन्या कोलकाता येतील असीम यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. हसन मुश्रीफ यांची पत्नी सहेरा मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे सारख कारखान्याचे 3.7 लाख शेअर्स आहेत. याच घोरपडे सारख कारखान्याला शेल कंपनीकडून कोट्यावधी रुपये मिळाले आहेत आणि हे पैसे घोटाळ्याचे आहेत."


"सरसेनापती संतीजी घोरपाडे सारख कारखान्याला मारुभूमी फायनान्स, सरसेनापती शुगर एलएलपी, नेक्सटजेन कंसल्टन्सी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, युनिव्हर्सल ट्रेडिंग एलएलपी, नवरत्न असोशीयटस एलएलपी, रजत कन्सूमर सर्व्हिसेज एलएलपी, माऊंट कॅपिटल, प्रायव्हेट लिमिटेड या शेल कंपनीकडून 100 कोटींहून जास्त रक्कम मिळाली आहे.", असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.


पाहा व्हिडीओ : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप 



उद्या ईडीकडे  मुश्रीफांच्या विरोधात अधिकृत तक्रार करुन पुरावे देणार : किरीट सोमय्या


शेल कंपन्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या मुलाने दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये मुश्रीफांनी 100 कोटी रुपये गुंतवले ते बेनामी असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केलाय. उद्या आपण मुश्रीफांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार असून पुरावे देणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.


दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफ तातडीने उत्तर देणार असून थोड्याच वेळात हसन मुश्रीफ कोल्हापुरात पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी दोन वाजता कोल्हापुरातील सर्किट हाऊस याठिकाणी हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलणार आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना हसन मुश्रीफ काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.