Rupali Chakankar on Anjali Damania : अंजली दमानिया यांना अनेक कपोलो कल्पित कथा सांगायची सवय आहे. अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली. एखाद्या व्यक्तीला आणि एका कुटुंबाला अंजली दमानिया सातत्याने बदनाम करत असतात. यापूर्वी देखील अंजली दमानिया यांनी अजित पवारांवरती अनेक आरोप केले, पण त्यातला कुठलाही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्या पार्थ पवार यांच्यावरती आरोप करत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे असे चाकणकर म्हणाल्या.
अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार
खरंतर या कुटुंबियांनी आपला घरातला माणूस गमावला आहे. अंजली दमानिया पुराव्या अभावी सातत्याने वक्तव्य करुन चर्चेत राहत आहेत असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
अंजली दमानिया यांनी दुःखाच्या क्षणी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील : अमोल मिटकरी
अंजली दमानिया यांनी दुःखाच्या क्षणी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे. माननीय अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, माध्यमांशी संवाद साधताना जाणीवपूर्वक संशय निर्माण करणे हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित प्रयत्न आहे. या कठीण आणि भावनिक काळात शब्दांचा विपर्यास करून वातावरण दूषित करण्याऐवजी, दुःखात सहभागी होणे अपेक्षित होते. तथ्यांशिवाय आरोप करणे हे ना माणुसकीला शोभतं, ना जबाबदार सार्वजनिक भूमिकेला. आपल्या असंवेदनशिलतेचा निषेध व धिक्कार असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचं खारगे समितीनं म्हटलं होतं. मात्र या सर्व शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फेटाळून लावल्या आहेत. आज (5 फेब्रुवारी) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. खारगे समितीतर्फे पार्थ पवार यांना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या की, 'मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना खारगे समितीनं कोणतीच क्लिन चीट दिलेली नाही. अजून समितीची शेवटची बैठक बाकी आहे. याविषयी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या धादांत खोट्या आहेत असे दमानिया यांनी म्हटलं आहे. 'पार्थ पवार यांचं नाव एफआयआरमध्ये का नाही याविषयी आमचा लढा आहे. कोणत्याही न्यायात सहानुभूतीचं कार्ड चालत नाही. हा जो घोटाळा पार्थ पवार यांनी केला आहे, त्यातून ते सुटणं शक्यच नाही. या प्रकरणाची सगळी कागदपत्रं उपलब्ध आहेत. त्यामुळे सहानुभूतीने या गोष्टी मिटणार नाहीत असे दमानिया म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या: