RTE Education : महाराष्ट्र सरकारच्या नव्या आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला नोटीस बजावली असून 8 मे पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. सरकारच्या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेशाची वाट कठीण झाल्याने ज्येष्ठ वकील ॲड. जयना कोठारी, ॲड. दीपक चटप, ॲड. पायल गायकवाड, ॲड. ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कांवर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.


नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान


आरटीईअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. यातील उपलब्ध शाळा नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. नुकतेच आरटीईचे ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. 


तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल


नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल. याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांत खासगी शाळांत मुभा देणारे नियम तेथील सरकारने तयार केले. मात्र तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. 2009 च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही. खासगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही. राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे मत याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. दीपक चटप यांनी मांडले. 


आरटीईतील बदलांमुळे इंग्रजी माध्यमांच्या विना अनुदानित खासगी शाळेत प्रवेश मिळणार नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागेल असे मत याचिकाकर्ते शिक्षण हक्क कार्यकर्ते वैभव एडके, राहुल शेंडे, वैभव कांबळे, अनिकेत कुत्तरमारे यांनी व्यक्त केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या