परभणी : शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 346 दिवस कारागृहात राहिल्यानंतर त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे. गुट्टे यांनी कारागृहातूनच 2019 मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले हे विशेष.


26  मार्च 2019 रोजी रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने अटक करुन गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते. यानंतर हे प्रकरण बरीच दिवस औरंगाबाद उच्च न्यायालयात चालले. तिथे त्यांना जामीन मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयातून त्यांनी सर्वोच न्यायालयात दाद मागितली आणि तिथेही अनेक तारखा झाल्यानंतर, आज त्यांना तब्बल 346 दिवसानंतर नायालयाने जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?
2017 मध्ये परभणीच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने 29 हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर सहा बँकाकडून तब्बल 328 कोटींचे कर्ज उचललं होतं. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन, ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले, त्याचबरोबर ऊस पुरवला, त्या परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या चार जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातीलही असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. यानंतर पाच राष्ट्रीयकृत बँका ज्यात आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक तर मुंबईची रत्नाकर बँककडून तब्बल 328 कोटीची रक्कम परस्पर उचलली. याबाबत बँकांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवली, तेव्हा हे प्रकरण उजेडात आले होते.

रत्नाकर गुट्टे याच्यावर 5 जुलै 2017 रोजी भादंवि कलम 406, 409, 417, 420 आणि 467, 468, 471, 120-ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात दोन वर्षानंतर कारवाईला सुरुवात झाली. 28 फेब्रुवारी 2019 रोजी गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंह पडवळ यांना अटक करण्यात आली होती. यानंतर औरंगाबाद सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड, डीवायएसपी पठाण यांचे पथक गंगाखेडमध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांना अटक करुन गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात हजर करुन या प्रकरणाचे दोषरोप पत्रही दाखल केले. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.