Ramdas Athawale on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार हे जातीयवादी नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. शरद पवार हे जातीयवादी नसून ते धर्मनिरपेक्ष असल्याचेही आठवले यांनी म्हटले. 


केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एबीपी माझासोबत बोलताना हे वक्तव्य केले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर राज्यात जातीयवाद वाढू लागल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. शरद पवार हे चांगले राजकीय नेते असले तरी जातीयवादी असल्याचे त्यांनी म्हटले. राज यांनी जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांची पाठराखण केली आहे. शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत. त्यांनी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही. पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. 


मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे श्रेय पवारांचे


औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे श्रेय शरद पवार यांना असल्याचे आठवले यांनी म्हटले. शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केल्यानंतर विद्यापीठ नामांतराचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर जातीय दंगल उसळल्याने नामांतर लांबणीवर पडले होते. या दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले आणि मतैक्य निर्माण केले. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले असल्याचे आठवले यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: