Rohit Pawar on Vijay Shivtare : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत जहाल शब्दांत टीका केली आहे. शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला असताना, त्यांनी राज्यातील अनेक देवस्थानांना देणग्या दिल्या. मात्र, त्यांना पुरंदर येथील खंडोबा मंदिर आणि तेथील विकासाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नाही, अशी टीका शिवतारे यांनी केली आहे. आता त्यांच्या या टीकेनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
तीनदा आमदारकी आणि पाच वर्षे मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास करू न शकणाऱ्या आमदार विजय शिवतारे यांनी आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का? हे आधी तपासावं असा सवाल करत रोहित पवारांनी शिवतारेंवर टीका केली आहे. श्रीक्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पात घोषणा करून 350 कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता देऊन अजितदादांनीच निधी दिला याचा विसर बहुतेक त्यांना पडला असावा. त्यामुळं टीका करताना शिवतारे साहेब यांनी जिभेला लगाम लावण्याची गरज आहे, अन्यथा पोपटासारखं ‘मिठू.. मिठू’ बोलणाऱ्यांचं काय होतं, याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे अशा शब्दात रोहित पवार यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली. खरं म्हणजे आज त्यांनी केलेली टीका ही स्वतःच्याच नाकर्तेपणाची दिलेली एकप्रकारे कबुली आहे. ज्या पक्षाने आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं त्याच पक्षाला त्यांनी फसवलं. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असे रोहित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते विजय शिवतारे?
विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपानुसार, शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला असताना, त्यांनी राज्यातील अनेक देवस्थानांना देणग्या दिल्या. मात्र, त्यांना पुरंदर येथील खंडोबा मंदिर आणि तेथील विकासाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नाही, असे शिवतारे यांनी म्हटले आहे. टीका करताना शिवतारे यांची जीभ घसरली आणि त्यांनी नेत्यांना उद्देशून “नेतेच दळभद्री” असे आक्षेपार्ह विधान केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या 50 वर्षांत विकासाच्या दृष्टीने काहीही झाले नाही. पुरंदर परिसरात आता मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत, ज्यात रस्त्यांचे दुपदरीकरण (डबल लाईन) देखील समाविष्ट आहे. ही कामे आता केली जात असल्यामुळे, पवारांच्या कार्यकाळात या भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे शिवतारे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
महत्वाच्या बातम्या: