Rohit Pawar : इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषणप्रकरणामुळे बंद पडलेली मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत दाखल झाल्याचे समोर येत आहेत. इटलीतील या कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने खरेदी करून येथे वापरात वापरात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच मुद्ययावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. अशा हानिकारक उद्योगास परवानगी का देण्यात आली? शासनाच्या लेखी कोकणवासीयांच्या जीवनाची किंमत शून्य आहे का? असा सवाल रोहित पवारांनी सरकारला केला आहे.  

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

इटलीत Miteni नावाच्या कंपनीतून जलाशयात सोडण्यात आलेल्या PFAS   केमिकल शरीरात गेल्याने तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना कॅन्सर सारखे गंभीर आजार झाले आहेत. तसेच 4000 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. नागरिकांनी आंदोलन करुन कंपनी बंद पाडली. बंद पाडलेल्या याच कंपनीच्या मशिनरी विकत घेऊन भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीने आपल्या रत्नागिरी MIDC मध्ये प्लांट लावला आहे. ज्यातून हे हानिकारक PFAS बाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे PFAS च्या नियंत्रणाबाबत भारतात कोणताच कायदा अस्तित्वात नसताना अशा हानिकारक उद्योगास परवानगी का देण्यात आली? शासनाच्या लेखी कोकणवासीयांच्या जीवनाची किंमत शून्य आहे का? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. शासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्काळ हा प्लांट बंद करावा त्याचबरोबर स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

न्यायालयाने या कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

मिटेनी कंपनी इटलीतील व्हेनेटो प्रांतात पीएफएएस या अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन करत होती. ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखली जाणारी ही रसायने निसर्गात आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. या उत्पादनामुळे येथील सुमारे साडेतीन लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. परिणामी कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकरणानंतर 2018 मध्ये कंपनी दिवाळखोर निघाली होती. त्यानंतर जून 2025 मध्ये इटलीतील न्यायालयाने या कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. असे असताना ही हा प्रकल्प आता लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत सुरु करण्याचा घाट राज्य शासनाच्या मदतीने घातला जात असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

कुपोषणामुळेच बालमृत्यू! कोट्यावधींचा खर्च करुन नेमकं कुणाचं पोषण? रोहित पवारांचा हल्लाबोल, बालकांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची चौकशी व्हावी