Continues below advertisement

मुंबई : अजितदादांचे (Ajit Pawar) महत्व कमी करण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून त्यामध्ये दादांच्याच पक्षातील एक विदर्भातील आणि एक कोकणातील नेता भाजपला मदत करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. ज्या लोकांना दादांनी सोबत नेलं तेच आता दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असंही रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी एबीपी माझाशी खास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

आमच्या राष्ट्रवादीमध्ये सर्व आलबेल आहे. आमच्या पक्षामध्ये नेते कमी आणि कार्यकर्ते, पदाधिकारी जास्त आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल असं आमदार रोहित पवार म्हणाले. तसेच आगामी काळात आम्हाला रस्त्यावरची लढाई जास्तीत जास्त लढावी लागेल असंही ते म्हणाले.

Continues below advertisement

Rohit Pawar On Ajit Pawar : दादांच्या दोन नेत्यांची भाजपला मदत

अजितदादांचे महत्व कमी करण्यासासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे मदत करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. ते म्हणाले की, "अजितदादांचे आणि एकनाथ शिंदेंचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची क्षमता अजितदादांकडे होती, पण ती आता कुठे दिसत नाही. कारण भाजपच त्यांची ताकद हळूहळू कमी करत आहे. त्यासाठी भाजपला राष्ट्रवादीतील एक विदर्भातील आणि एक कोकणातील नेता भाजपला मदत करतोय.

आमच्याकडे एक परिवार होता, अजितदादांसोबत सगळे नेते होते. पण फक्त भाजपसोबत जाण्यासाठी या सगळ्यांना सोडलं. पण दादांनी ज्यांना सोबत नेलं, तेच नेते आता दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात हे पाहून कुठेतरी वाईट वाटतं असंही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar On BJP: भाजपचा मोर्चा अजितदादांकडे?

वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या चौकशीसंबंधी रोहित पवारांनी या आधी एक वक्तव्य केलं होतं. आता ठाण्याचा मोर्चा बारामतीकडे वळवला जातोय की काय असं ते म्हणाले होते. त्यावर विचारले असता रोहित पवार म्हणाले की, वसंतदादा इन्स्टिट्यूट चांगलं काम करत आहे. वर्षाला त्याचं ऑडिट केलं जातं. असं असतानाही सरकाकडून मिळणाऱ्या फंडचे ऑडिट करण्याचे आदेश दिले गेले. त्यामागचा हेतू स्पष्ट दिसतोय. पवार साहेबांसोबत अजित पवार त्या ठिकाणी काम करताहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुरघुड्या केल्या जाण्याचा प्रयत्न आहे का असं म्हणालो होतो.

Rohit Pawar On Jay Pawar Baramati : बारामतीमध्य़े पवार वि. पवार?

जय पवार बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, "जय पवार यांचे नाव मतदार म्हणून बारामतीमध्ये नोंद झालेलं आहे. अजितदादांशी चर्चा करून ते अंतिम निर्णय घेतील. बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळेल हे नक्की."

Rohit Pawar On Vote Chori : मतचोरी होत असल्याचं भाजपला मान्य

रोहित पवार म्हणाले की, आधीही आम्ही निवडणुकीतील मतचोरीचा मुद्दा मांडला होता. आता भाजपनेही तो मान्य केला. आशिष शेलारांनी दुबार मतदान होत असल्याचं मान्य केलं. तसेच निवडणूक आयोगानेही त्याला पुष्ठी दिली. त्यामुळे आमचा मुद्दा हा योग्य असल्याचं स्पष्ट झालं असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, "2019 ते 2024 या दरम्यान एकूण 32 लाख मतदार वाढले. मात्र 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कमी खासदार निवडून आल्यानंतर मात्र परिस्थिती वेगळी झालं. लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान, सहा महिन्यात 48 लाख मतदारांची वाढ झाली. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर त्याचे सीसीटीव्ही मिळावेत अशी पहिली मागणी आम्ही केली. त्या माध्यमातून खोटे मतदार शोधता येतील असं आम्हाला वाटलं. पण ते सीसीटीव्ही कॅमेरे देऊ शकत नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं."

आपल्या मतदारसंघात 14 हजार दुबार मतदार होते. त्यामध्ये आमच्या हक्काचे 10 हजार मतदार कमी केले. शेवटच्या महिन्यात 4200 मतदार वाढवण्यात आले, त्यावर आम्हाला आक्षेपही घेता आला नाही असं रोहित पवार म्हणाले. आमचे काही उमेदवार कोर्टात गेले आहेत. पण आम्ही जे निवडणूक आयोगाकडून पुरावे मागितले ते आम्हाला मिळत नाहीत. अनेक ठिकाणी खोटे आधारकार्ड काढण्यात आल्याचं दिसून आलं असंही ते म्हणाले.

इलेक्शन कमिशनने दिलेल्या याद्यांवरून अनेक घोळ समोर आले आहेत. मतदारयादीच्या घोळावरुन आम्ही निवडणूक आयोगावर टीका करतोय, पण त्याला उत्तर भाजप का देतंय? असा प्रश्न रोहित पवारांनी केला.

Rohit Pawar On Election : आघाडीचा निर्णय एकत्र बसून घेऊ

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका या स्थानिक नेत्यांची मतं जाणून घेऊन लढल्या जातील. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायचं का की स्वतंत्र लढायचं हे सगळे एकत्र बसून ठरवू अशी माहिती रोहित पवारांनी दिली.