मुंबई : मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारने आता विखरण येथील इतर प्रकल्पग्रस्तांच्याही फेरमूल्यांकनाचा निर्णय घेतला आहे. 199 हेक्टरचं फेरमूल्यांकन करुन योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

धर्मा पाटलांसह इतर प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या वाढीव मोबदल्याचा शासनाच्या तिजोरीवर 38 ते 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नव्हता. शिवाय सरकारी अधिकारी याची दखलही घेत नसल्याने हतबल होऊन त्यांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या केली.

धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला मिळणार

धर्मा पाटलांच्या आत्महत्येनंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना जमिन संपादनाचा 54 लाख रुपये मोबदला मिळणार आहे. धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल ऊर्जा विभागाला दिला.

पाटील यांच्या पाच एकर जमिनीसाठी 54 लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. यापूर्वीचा पंचनामा रद्द करुन रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे धर्मा पाटील यांच्या नावे 28 लाख 5 हजार 984 रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना 26 लाख 42 हजार 148 रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.

धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबीयांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.

संबंधित बातम्या :

आत्महत्या टाळण्यासाठी मंत्रालय इमारतीच्या भिंतीला जाळ्या


मंत्रालयाच्या 5 व्या मजल्यावरुन उडी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू


नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न


मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न


भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी


अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन