मुंबई : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणांमावर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी शिक्षण सेवक पदभरतीस बंदी घालण्यात आली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीव्दारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली आहे, असा शासन निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जाहीर केला आहे. त्यामुळे 'पवित्र' शिक्षक भरती पुन्हा होणार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.


शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. गायकवाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे 6 हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.





कोरोनामुळं अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासकीय पदभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया पदभरतीच्या बंदीतून वगळण्यात आली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खासगी अनुदानित, अशंत: अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील जवळपास 12 हजार 140 शिक्षण सेवक/ शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने ही पदभरती होत आहे.



शिक्षण सेवक पदभरतीला विशेष परवानगी दिली असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरु व्हायला वेळ लागू शकतो. अंतर्गत बाबींची पुर्तता करण्यासाठी किमान एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पदभरतीला परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्ष भरती प्रक्रियेसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल असं दिसतंय.