विशेष म्हणजे 28 पैकी 26 नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. केवळ शिवसेनेचे नगरसेवक मनीष कदम आणि आशा दिशागत यांनी पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठींना विचारून मग आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे हा ठराव घेतल्याचे अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते.
बोराडेंचा नुकताच फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे एक हाती वर्चस्व आहे. विनोद बोराडे आमदार मेघना बोर्डीकर तथा त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर झालेल्या महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या अठरा नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दुसरीकडे पालम नगर पंचायतीमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता आहे. तर भाजपकडे पालममधील उपनगराध्यक्ष पद आहे. पालम नगर पंचायतीमध्येही 2 मार्चला अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेतदेखील सीएए विरोधात ठराव घेण्यात आला. यामुळे भाजपाचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने सीएएविरोधात ठराव घेऊन त्याचं समर्थन केल्यामुळे रोकडे यांनाही निष्कासित केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिकृत पत्र काढत दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.