पुण्यातील प्रभाग सातच्या उमेदवार रेश्मा भोसले या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका होत्या. राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला होता.
काय आहे प्रकरण?
भाजपनेही रेश्मा भोसलेंना तत्काळ तिकीट दिलं. पण त्याआधी सतिश बहिरट यांना एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे एकाच प्रभागात दोन उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिले. पण आधी सतिश बहिरट यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. असं असतानाही निवडणूक आयोगाने रेश्मा भोसलेंना भाजपच्या चिन्हावर लढण्याची मुभा दिली. त्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाने रेश्मा भोसलेंच्या विरोधात निर्णय दिला आहे.
दरम्यान यापूर्वी देखील क्षेत्रीय निवडणूक कार्यालयाकडून रेश्मा भोसलेंची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची नामुष्की ओढावली होती. मात्र महापालिका आयुक्तांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांचं मत मागितलं. रेश्मा भोसलेंच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि त्यांच्या भाजपकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे त्या भाजपच्या चिन्हावर प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवणार होत्या.
मात्र काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आणि रेश्मा भोसलेंच्या विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने अखेर बहिरट यांच्या बाजूने निकाल दिल्याने रेश्मा भोसले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पुणे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
संबंधित बातमी :