अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पूर्वीचे लॉकडाऊन आणि त्यानंतर रुग्णसंख्येत घट पाहता आता 'ब्रेक द चेन'अंतर्गत लावलेले निर्बंध शिथिल करावेत, असं पत्र अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे..
कोरोनाबाधितांची त्यावेळची वाढती संख्या पाहून अमरावती जिल्ह्यात यापूर्वीच लॉकडाऊन लागू होते. त्यानंतर बाधितांच्या संख्येत घट झाल्याने निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. आता राज्य शासनाकडून ब्रेक द चेन अंतर्गत पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत.अमरावतीत यापूर्वीचे लॉकडाऊन आणि रुग्णसंख्येत झालेली घट पाहता नव्या अधिसूचनेचा पुनर्विचार करणे आवश्यक वाटते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत आणि व्यापारी बांधवांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
मागच्या महिन्यातील लॉकडाऊनला व्यापारी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आता हळूहळू येथील स्थिती सुधारून लॉकडाऊन खुले होत असतानाच पुन्हा नवे निर्बंध आल्याने व्यापारी आणि नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद राहून नुकसान होत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत व व्यापारी बांधवांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
भारतात कोरोनाचा उद्रेक का होतोय? केंद्र सरकारचे काही अनुमान
देशात कोरोना नियंत्रणात येतोय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळतंय. देशात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडत आहे. सोमवारी एकाच दिवसात कोरोनाचे 96, 517 नवीन रुग्ण सापडले. त्याच्या आधी एक दिवस लाखाहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली होती. सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी 26 लाख 84 हजार 477 इतकी झाली आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर काय उपाय योजना करता येतील हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात एक उच्च स्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीत देशात कोरोनाची संख्या का वाढतेय याची मिमांसा करण्यात आली. देशात केवळ दहा राज्यात कोरोनाचे बहुतांश रुग्ण आढळतात. नागरिक कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत नाहीत त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं केंद्र सरकारचे स्पष्ट मत आहे.