बुलडाणा : गोवर, रुबेला लस दिल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात 17 शालेय मुलांना रिअ‍ॅक्शन आल्यानंतर आज चौथ्या दिवशी आणखी 12 मुलांची तब्येत अत्यवस्थ झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गोवर रुबेला लसीकरणाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. त्यानंतर बुलडाणा, अंचरवाडी, मातला, मढ येथील नऊ मुलांना रिअ‍ॅक्शन आली होती. त्यांना वेगवेगळ्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी तिसर्‍या दिवशी 8 मुलांना रिअ‍ॅक्शन आली होती. अंगाला खाज येणे, उलटी होणे, यासारखे प्रकार झाल्यामुळे काळजीपोटी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रात्री त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आज चौथ्या दिवशी आणखी 12 मुलांना लसीमुळे रिअ‍ॅक्शन आली आहे. त्यामध्ये करवंड आश्रम शाळेतील 8 वी व 9 वीच्या मुलां-मुलींना रिअ‍ॅक्शन आली आहे. त्यामध्ये रेश्मा राजु राठोड, सोनाली उंबरकर, सोमनाथ  गायकवाड, पवन  देशमुख, शुभम मंडावार, चेतन  तारु, जीवन  वाकोडे, मयुर  उगले, ओम  सोनुने, सागर  शिंदे, आदेश  तारु, अनिकेत  अंभोरे यांचा समावेश आहे. या मुलांना लस घेतल्यानंतर त्रास होत असल्यामुळे त्यांना तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दररोज कुठे ना कुठे गोवर, रुबेला लसीकरणामुळे शालेय मुलांना रिअ‍ॅक्शन येत असल्यामुळे पालकामध्ये भीतीचे वातावरण आहे.  जिल्हा आरोग्य यंत्रणेने पालक व शिक्षकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व रिअ‍ॅक्शन आल्यात तात्काळ दवाखान्यात भरती करावे, असे आवाहन केले आहे. यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील खरांगणा येथील स्वावलंबी विद्यालयातील 10 व्या वर्गातील दोन तर आंजी येथील शाळेतील 1 अशा तीन विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाली होती. गोवर रुबेला मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे गोवर-रुबेला सारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुंबईत या मोहिमेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते की, गोवर आणि रुबेला आजारामुळे देशात दरवर्षी हजारो बालके मुत्यूमुखी पडतात. आपल्या बालकांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मुलांना लस द्यावी. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांच्या समन्वयातून सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपले योगदान देऊन मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले होते. महाराष्ट्रात झिरो मिझेल्स व झिरो रुबेला करण्यासाठी  मोहिमेत सहभागी व्हा - आरोग्यमंत्री आरोग्य मंत्री यावेळी म्हणाले होते की, केंद्र शासनाच्या साहाय्याने गोवर रुबेला लसीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण शहरी व ग्रामीण भागात सुरू केला आहे. 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सध्या ही मोहीम 20 राज्यांमध्ये राबविली जात असून प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन आपल्या बालकांचे  लसीकरण झाले असल्याची खात्री करावी असे आरोग्यमंत्री या वेळी म्हणाले होते. राज्यात सर्वत्र सरकारी, खासगी शाळांमध्ये, अंगणवाडी, सरकारी दवाखाने, आरोग्य उपकेंद्रे यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोवर चे उच्चाटन व रुबेला वर नियंत्रण असे २०२० पर्यंतचे लक्ष्य समोर ठेऊन ही राज्यव्यापी मोहीम सुरु करण्यात आली आहे. अशी आहे लसीकरण मोहीम ·       आजपासून सहा आठवडे राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम ·       9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकाचे लसीकरण करणे आवश्यक ·       शाळा, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांवर मोफत लसीकरण उपलब्ध ·       या आधी गोवर/ एम आर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक. ·       पुन्हा लसीकरणाने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. ·       एक गोवर-रुबेला लस करते, दोन आजारांवर मात