मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचं (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. मंगळवार 23 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना हे समन्स बजावण्यात आलंय. मागेही जेव्हा वायकरांना हे समन्स बजावण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी आजारी असल्याचं कारण देत चौकशीला गैरहजरी लावली. मात्र तेव्हा रवींद्र वायकरांनी कोणताही वैद्यकीय चाचणीचा पुरावा दिला नव्हता. 


जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. पण तेव्हा आजारी असल्याचं वायकरांनी सांगितलं. त्याचवेळी ईडीकडून त्यांना वैद्यकीय चाचणीचे पुरावे देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ईडीकडून वायकरांना समन्स बजावण्यात आलंय. ईमेलद्वारे ईडीने हे समन्स बजावलंय. 


वायकरांच्या लेकीला देखील ईडीचं समन्स जाण्याची शक्यता


जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आलेत. तसेच यामध्ये जे आर्थिक व्यवहार झाले ते रवींद्र वायकर यांच्या लेकीच्या खात्यावरुन झाले. त्यामुळे त्यांच्या लेकीला देखील ईडीची नोटीस जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येतेय. तसेच या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या लेकीची देखील चौकशी करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. 


प्रकरण नेमकं काय?


रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना ईडीकडून देखील समन्स बजावण्यात आलं आहे. 


महाविकास आघाडीतील नेते ईडीच्या रडावर 


दरम्यान मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात येत आहे. शुक्रवार 19 जानेवारी रोजी एकाच दिवशी रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते सध्या ईडीच्या रडावर असल्याचंं चित्र असल्याचं पाहायला मिळत आहे. 


हेही वाचा : 


Kishori Pednekar : आधी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर, एकाच दिवशी महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना ईडीचं समन्स