Ravindra Dhangekar : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला आहे. त्याच्याबाबत आता रोजच नवनवे खुलासे होत आहेत. सध्या निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला मिळालेल्या शस्त्र परवान्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका होत आहे. यावर माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस पत्र लागतं, ज्यांनी ज्यांनी शिफारस पत्र दिले त्यांची नावे सांगा असेही ते म्हणाले. मंत्री योगेश कदम यांची जर चूक झाली असेल तर आम्ही त्यांना ती चूक दुरुस्त करायला लावू असेही धंगेकर म्हणाले.  

Continues below advertisement

पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर आमदार खासदाराच्या शिफारस लागते

पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर आमदार खासदाराच्या शिफारस लागते. त्यानुसार गृह खाते त्याला शस्त्र परवाना देते. योगेश कदम यांना टार्गेट न करता ज्यांनी शिफारस केली. तो फॉर्म शोधून त्यावर कोणाच्या सह्या आहेत ते बघावे लागेल असेही ते म्हणाले. निलेश घायवळला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मदत केली अस वाटतं? असा प्रश्नव विचारला असता धंगेकर म्हणाले की, समीर पाटील नावाचा व्यक्ती आहे हा निलेश घायवळची गुन्हेगारी चालवतो. त्यातल्या कर्त्या करवित्याची चौकशी झाली पाहिजे. त्याला अटक झाली पाहिजे. समीर पाटील हा चंद्रकांत दादांची भाषा बोलत असेल तर मी त्याला उत्तर देईल असे धंगेकर म्हणाले. 

चोर कधी चोरी केली असं म्हणत नसतो

रोहित पवार काय म्हणाले हे मला माहित नाही.  पुण्यातील गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे, एवढेच माझं मत आहे. रोहित पवार यांनी संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांची कागदपत्र पोलिसांना द्यावीत असेही धंगेकर म्हणाले. समीर पाटील हा माणूस सगळ्यांना पद आणि उमेदवारी देतो. पोलिसांवर समीर पाटीलचा अंकुश आहे. समीर पाटीलचे सगळे फोटो पाठवले आहेत, आता काय त्याचा नरडं धरायचं काय? असा सवाल धंगेकर यांनी केला. चोर कधी चोरी केली असं म्हणत नसतो. एकदा नेत्यासोबत फोटो काढू शकतात पण वारंवार त्याच नेत्यासोबत फोटो असतील तर काय म्हणायचं? असा सवालही धंगेकर यांनी केला. 

Continues below advertisement

मत द्या नाहीतर देऊ नका, पण पुण्यातली गुन्हेगारी थांबली पाहिजे

पुण्यातली दादागिरी थांबवली पाहिजे. ही दादागिरी थांबवली नाही तर पुणेकर मला माफ करणार नाहीत. चाळीस वर्षे झाले पुण्यात काम करतोय. राजकारण बाजूला ठेवा. आम्हाला मत द्या नाहीतर देऊ नका हा मुद्दा नाही पण पुण्यातली गुन्हेगारी थांबली पाहिजे.  मी पुणेकरांसाठी बोलतो. माझा यात काही स्वार्थ नाही. कोथरुडची दादागिरी आतापर्यंतची सगळी आंदोलन मी टोकापर्यंत नेली आहेत. कोणतेही आंदोलन मध्ये सोडलं नाही. मी शिवसेना प्रमुखांचा कार्यकर्ता आहे. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे सत्ता समाजाच्या आड येत असेल तर आणि नागरिकांवर अन्याय होत असेल तर सत्तेला लाथ मारा आणि समाजासाठी काम करा असे धंगेकर म्हणाले.