कापूस आणि सोयाबीन आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये 21 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी दुपारी बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर आणि इतर पाच जणांना अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तुपकर यांच्यावर अनेक गुन्हे अजामीनपात्र असल्याने जामीन न मिळाल्यास कारागृहात जाणे लागण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात तुपकर यांनी आंदोलन पुकारलं होतं. याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसाठी रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली होती. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला होता. 17 नोव्हेंबर बुधवारपासून सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शुक्रवारी संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला होता. दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्यानं कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्यानं आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच गदारोळ उडाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. तारांबळ उडालेल्या प्रशासनानं सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळलं.