रत्नागिरी : पोहण्यासाठी झाडावरुन तळ्यात उडी मारण्याचा प्रयत्न रत्नागिरीतील तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. पाय घसरल्याने तरुण झाडावरुन थेट तळ्याच्या कठड्यावर पडला. या घटनेत त्याच्या पाठीला जबर दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


रत्नागिरीतल्या तेली आळी येथील तलावाजवळ मंगळवारी (13 ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली. रत्नागिरीच्या या तलावात पोहण्यासाठी अनेक तरुण जातात. शिवाय झाडावरुन तळ्यात उडी मारण्याचा अतिउत्साह देखील करतात. मात्र हाच अतिउत्साह या तरुणाच्या अंगलट आला.

उडी मारण्यासाठी हा तरुण झाडावर चढला खरा, मात्र पावसामुळे शेवाळ पकडल्याने तरुणाचा पाय झाडावरुन सरकला आणि पायाखाली असलेलं लाकूडही तुटलं. त्यामुळे हा तरुण झाडावरुन थेट तळ्याच्या कठड्यावरच पडला. त्यामुळे त्याच्या पाठीला जबर मार लागला आहे. सध्या त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.