रत्नागिरी: कोकणात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांनी शिवसेनेच्या पदरात भरभरुन माप टाकल्याचं पहायला मिळालं. तर स्व-बळावर उतरलेल्या भाजपला चिपळूण वगळता जनतेने नाकारले. 4 नगरपालिकांमध्ये केवळ एकाच ठिकाणी रत्नागिरीत शिवसेनेचे राहुल पंडित विजयी झाले असले तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आकड्यामध्ये चांगलीच भर पडली आहे.

खेड नगरपालिका:

खेड नगरपालिकेत मनसेचे वैभव खेडेकर नगराध्यक्षपदी निवडून आले असले तरी मनसेच्या वर्चस्वाला धक्का देत शिवसेनेने 17 पैकी 10 नगरसेवक निवडून आणले आहेत. इथे भाजपला खातेही खोलता आले नाही.

रत्नागिरी नगरपालिका:

रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत 30 पैकी 17 नगरसेवक निवडून आणले आहेत आणि नगराध्यक्षपदी देखील शिवसेनेचा उमेदवार विराजमान झाला आहे. भाजपला इथे केवळ 6 जागा मिळाल्या आहेत.

चिपळूण नगरपालिका:

चिपळूणमध्येही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का देत 10 नगरसेवक निवडून आणले आहेत. भास्कर जाधव यांची नाराजी इथे राष्ट्रवादीला चांगलीच भोवली असून राष्ट्रवादीच्या केवळ 4 जागा निवडून आल्या आहेत. मात्र सेनेतून आयत्यावेळी भाजपामध्ये आलेल्या सुरेखा खेराडे यांच्या रूपाने भाजपला नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागली आहे. भाजपने 5 जागांसह खातं खोललं आहे.

राजापूर नगरपालिका:

राजपूरमध्ये काँग्रेसने नगराध्यक्ष हनीफ काझी यांच्या रूपाने गड राखला असला तरी राजापूर शहरात 8 जागा जिंकून शिवसेनेने  राजापूर नगरपालिकेत आपली ताकद वाढवली आहे. दापोली नगरपंचायत मध्ये शिवसेनेनं आपला गड राखल्याचे पहायला मिळतं आहे.

दापोली नगरपंचायत:

दापोली नगरपंचायतमध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र इथे कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने ही नगरपालिका त्रिशंकू अवस्थेत गेली आहे.