बाईकवरुन परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याला एसटीने चिरडलं
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2017 12:19 PM (IST)
रत्नागिरी : रत्नागिरीत परीक्षेसाठी निघालेल्या अकरावीतील एका विद्यार्थ्याचा एसटी बसखाली चिरडून मृत्यू झाला. लांजा शहर परिसरात आज सकाळी ही घटना घडली. अमेय वाईकर असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावर लांज्यात प्रतीक हॉटेलजवळ सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अमेय वाईकर दुचाकीवरुन परीक्षेला जात होता. अपघात घडला त्यावेळी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. यावेळी मार्गावरुन जाणाऱ्या बैलांना धक्का लागून अमेयचा खाली पडला. याचवेळी मागून आलेल्या एसटी बसने अमेय वाईकरला चिरडलं. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.