सांगली : नवीन वर्षाचा मुहूर्त साधून सांगलीतील नादुरूस्त रस्त्यांना राजकीय नेतेमंडळींची नावं देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, यात सत्ताधारी भाजपच्या मुख्यमंत्र्यांपासून नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्यासह पतंगराव कदम यांच्याही नावाचा समावेश आहे. सांगलीतील रस्ते बचाव कृती समितीने हा उपक्रम राबवला आहे.


सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी खड्डे मुक्त रस्त्याची घोषणा केली होती. त्यासाठी वेगवेगळ्या डेडलाईनही देण्यात आल्या होत्या. पण सांगलीमधील रस्त्यांची स्थिती 'जैसे थे'च आहे. मागील वर्षभरापासून खराब रस्त्यावरुन प्रवास करताना सांगलीकरांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे शहरातील नादुरुस्त रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी वारंवार मागणी होत आहे. पण त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांना राजकीय नेते मंडळींची नावे देण्याचा कार्यक्रम रस्ते बचाव कृती समितीने हाती घेतला आहे.

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम अशा भाजप-कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची प्रतिकात्मक नावे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, यात सांगलीतील तब्बल 15 रस्त्यांना जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची नावे देण्यात आली आहेत.

शहरातील कोणत्या रस्त्याला कोणाचे नाव

  1. सांगली-कोल्हापूर रस्ता 100 फुटी चौक :  परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी एक्स्प्रेस वे

  2. शामरावनगर चौक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पथ

  3. टिळक चौक : आमदार पतंगराव कदम पथ

  4. त्रिमूर्ती टॉकीज चौक (वखारभाग) : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील पथ

  5. स्टेशन चौक : उपमहापौर विजय घाडगे पथ

  6. शिवेच्छा हॉटेल चौक : जगन्नाथ ठोकळे पथ

  7. स्फूर्ती चौक (विश्रामभाग) : आमदार सुधीर गाडगीळ पथ

  8. मनपा नवीन इमारती जवळ कुपवाड : शेडजी मोहिते पथ

  9. दिंडीवेस (मिरज) : आमदार सुरेश खाडे पथ

  10. शिवाजी रोड (मिरज) : महापौर हारुणभाई शिकलगार पथ

  11. किसान चौक (मिरज) : खासदार संजय काका पाटील पथ


दरम्यान, काही दिवसांपूर्वी सांगली - पेठ दरम्यानचा खराब रस्त्याचा विषय चव्हाट्यावर आला होता. जर या रस्त्याची वेळीच दुरुस्ती न झाल्यास या रस्त्याला  पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्याचा इशारा रस्ते बचाव कृती समितीने दिला होता. समितीच्या इशाऱ्याने प्रशासनाला चांगलाच घाम फुटला होता.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे मुजबून रस्त्याची अवस्था सुधारली. या रस्त्याचे काम समाधानकारक झाल्याने त्याला पंतप्रधान मोदींचे नाव देण्याचा निर्णय कृती समितीने मागे घेतला आहे.

संबंधित बातम्या

सांगलीतील या रस्त्याला 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं’ नाव देणार?