Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या दोन्ही पक्षांना जनतेचं काहीही पडलेलं नाही. त्यामुळं छोट्या पक्षांनी एकत्र यायला हवं. नाहीतर सर्वांनी स्वतंत्र लढायला हवं असे मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे. सत्तेत एकच पक्ष जास्त वेळ राहिला तर ते लोकशाहीला धोक्याचं असल्याचे जानकर म्हणाले. भाजप हा जुमला पक्ष आहे. त्यामुळं यापुढं भाजपसोबत जाणार नसल्याचे जानकर म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करु नये असे जानकर म्हणाले. यावेळी बोलताना जानकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या दोन्ही पक्षांना जनतेचं काहीही पडलेलं नसल्याचे जानकर म्हणाले. तसेच यापुढे भापजसोबत जाणार नसल्याचं त्यांनी सांगितले.
लोकसभेला जानकरांचा पराभव, विधानसभेपूर्वी महायुतीतून बाहेर पडण्याचा घेतला होता निर्णय
महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र त्यांचे उमेदवार उभे केले होते.
दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच
दिल्लीच्या निवडणुका आहेत त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन ही आमची भूमिका नाही, तर वन नेशन वन एज्युकेशन अशी आमची भूमिका आहे. देशातील सर्वच मुलांना एकच शिक्षण पद्धतीनं शिकवले गेले पाहिजे, हाच मुद्दा आमचा दिल्लीच्या निवडणुकीत राहील. भाजपसोबत आम्ही नाही. भाजपसोबत आम्ही नाही. भाजप सोबत आम्ही नाही हे वारंवार सांगितले आहे. बिहारची निवडणूक ही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. किंबहुना मुंबई महापालिकेची तयारी देखील सुरू केलेली आहे. मुंबई सुद्धा आम्ही स्वबळावरून लढून आम्ही आमचं खातं खोलणार, यात काही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी व्यक्त केला होता. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका स्वबळावरती आम्ही लढणार असल्याची घोषणा देखील जानकरांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या: