या व्हिडीओमध्ये रावसाहेब दानवे एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत. "देशातले सगळे चोट्टे एक झालेत आणि मोदींजींना येऊ देऊ नका म्हणत आहेत तसेच आपल्याकडं देखील सारे चोट्टे एक झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणत आहेत. मी मोदीजींचा माणुस आहे. मी तुम्हाला पैसे देतो पण त्यांना(विरोधकांना) पैसे भेटत नाही", असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
रावसाहेब दानवेंच्या या वादग्रस्त वक्तव्याचा राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाचार घेतला आहे. "दानवेंचं हे वक्तव्य एखाद्या प्रदेशाध्यक्षाला हे न शोभणारं आहे. आपण कोणत्या पदावर आहोत याचं त्यांनी भान ठेवायला हवं", अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी देखील दानवेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. "भ्रष्टाचारातुन जमा केलेल्या पैशांची दानवेंना मस्ती आहे. यापुर्वी देखील शेतकऱ्यांना शिवी देऊनही भाजपनं त्यांच्यावर कारवाई केली नव्हती. दानवेंची ही मस्तीच भाजपच्या पडण्याचं कारण बनेल", असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.