मुंबई : काळ बदलतो, तसे सर्वच क्षेत्रांत नवे प्रवाह अनुभवायला मिळतात. शिक्षण क्षेत्रात देखील अनेक बदल करण्यात आले असून त्यानुसार नवीन योजना  राबवण्यात येत आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची  'सदिच्छा दूत' म्हणून निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे. 


शिक्षण क्षेत्रात डिसले गुरुजींनी हाती घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण अधिक सुलभ होत आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी हाती घेतलेले उपक्रम नव उद्योजकांना प्रेरणादायी करणारे ठरतील, म्हणूनच हे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत या हेतूने  रणजितसिंह डिसले यांची सदिच्छा दूत म्हणून निवड केली आहे.


सदिच्छा दूत म्हणून आता डिसले गुरुजी इनोव्हेशन सोसायटीचा विकास होण्यासाठी तळागाळातील विद्यार्थी, नव उद्योजक, प्राध्यापक, स्टार्टअप यांच्या पर्यंत योजनांचा प्रसार आणि प्रचार करणार आहेत.  राज्य शासनाच्या स्टार्टअप धोरण 2018 च्या प्रभावी अंमलबजावणीकरता महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत राज्यातील सर्व घटकांकरता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबंधित विवीध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबवले जातात. 


युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' डिसेंबरमध्ये रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला. सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार होता. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली होती. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.