Ramdas Kadam vs Anil Parab : शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब वादात नवीन ट्टिस्ट पहायला मिळतोय. किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत रसद रामदास कदम किंवा इतर कुणी नव्हे तर आपण पुरवली, असा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी केला आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवल्याचा आरोप होत होता. यामुळे रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात बिनसलं होतं. या प्रकरणाला आता नवीन ट्विट्स आलाय.
माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांसोबत आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी रविवारी गोप्यस्फोट केलाय. 17 मार्च 2017 पासून अनेक कार्यालयामध्ये वादग्रस्त साई रिसॉर्ट संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. मिळालेली माहिती किरिट सोमय्या यांना पुरवल्याचे आरटीआाय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी सांगितलं. दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांना आपणच भाजप नेते किरिट सोमय्यांचा मोबाईल नंबर दिल्याचे पुरावेही रिझवान काझी यांनी सादर केले.
शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषण व्हायरल झालं होतं. त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या विरोधात सोमय्या यांना रसद पुरवल्याचे आरोप झाले. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मुंबईतल्या खळबळजनक पत्रकार परिषदेनंतर दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी पुढे आलेत. शनिवारी शिवसेना नेते रामसाद कदम यांनी आपल्यावरील आरोप फेटाळल्यानंतर रिझवान काझी यांनी खळबळजनक माहिती दिली आहे.
रिझवान काझी यांनी वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात पहिल्यांदा माहितीचा अधिकार टाकल्याचा दावा केलाय. त्याबाबतचे कागदोपत्री पुरावे देत वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण मागे राहिलंय आणि राजकारण खेळलं जात असल्याची खंत आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी व्यक्त केलीय. या प्रकरणातील सर्व माहिती भाजप नेते किरिट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा रिझवान काझी यांनी केलाय. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील माहितीच्या अधिकारात मिळालेली कागदपत्र आपण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार असल्याचेही काझी म्हणाले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live