महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेतही महायुतीलाच सत्ता मिळणार, मतदान होताच केंद्रीय मंत्री खडसेंना विश्वास
नगरपालिका आणि महानगरपालिका मधील यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीला यश मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.
Raksha Khadse : 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे, दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. परवा म्हणजे 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिका मधील यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीला यश मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील निवडणुका सुरू असलेल्या जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील महायुतीची सत्ता येईल
नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा परफॉर्मन्स हा चांगला राहिला आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील महायुतीची सत्ता येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे. जळगाव जिल्हा परिषद निवडणूक महायुती म्हणून की स्वबळावर या संदर्भात त्या वेळेची परिस्थिती बघून निर्णय घेतले जातील. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील तसेच दोन्ही खासदार आणि त्या त्या ठिकाणचे आमदार जिल्हा परिषद निवडणूक महायुतीत लढण्यासंदर्भात निर्णय घेतील असे खडसे म्हणाल्या.
एकनाथ खडसे यांच्या अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याच्या मुद्यावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, त्या संदर्भातली माहिती मला आजच सकाळी मिळाली आहे. सध्या हा विषय कोर्टात सुरू आहे. त्यामुळं जे काय आहे ते कोर्टात समोर येईल असे खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांना भोसरी प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण
दरम्यान, राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज (7 फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 438 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2 हजार 624 तर पंचायत समितीसाठी 4 हजार 814 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या सगळ्यांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. आज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान ही मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरु आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय. त्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी होणार आहे.
























