Rajya sabha Election: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अशातच विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेकडून  मिलिंद देवरांना ( Milind Deora) राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप उपमुख्मंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचा उमेदवार कोण असणार? याबाबत घोषणा केलेली नाही. 


महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा


महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली असली तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळं अजित पवार यांचा राज्यसभेचा उमेदवार कोण? याबात तर्क वितर्क लढवले जातायेत.  दरम्यान, भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे. 


भाजपनं चौथा उमेदवार दिला नाही, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता


राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जांगांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीनं तयारी सुरु केली होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखी बळ मिळाले होते. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती. तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणं कठीण असल्याचं दिसल्यामुळे भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.


काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरेंनी उमेदवारी


दरम्यान काँग्रेसकडून (Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून राज्यसभा (Rajya Sabha Elections 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचं नाव आहे. काँग्रेसनं यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी, एकनाथ शिंदेंकडून मिलिंद देवरांना संधी