Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार हे स्पष्ट झालं आहे. याच सहाव्या जागेसाठी शिवसेना आज उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारलीय. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार आहे. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय. मंगळवारी टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतील असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. त्यामुळे सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीचा हात कुणाच्या डोक्यावर असणार याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे संभाजीराजेंची पुढची भूमिका काय असेल याकडंही लक्ष लागलंय. याच अनुषंगाने शिवसेनेच्या एका बड्या नेत्यासोबत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांची आज बैठक पार पडणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा आज सुटणार का याची उत्सुकता लागली आहे. 


राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आज उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंसोबतच कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या नावाचीही चर्चा आहे. संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेचाही सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवर नक्की कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शिवसेना आज सहावा उमेदवार जाहीर करणार?


शिवसेना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात सहावा उमेदवार देत आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयानंतर शिवसेना आपल्या उमेदवाराच्या शोधात आहे. चंद्रकांत खैरेचं नाव या जागेसाठी चर्चेत आहेच, पण त्यासोबतच कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याही नावाची चर्चा आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापुरातील चेहऱ्याचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


 "उद्या तुम्हाला सहाव्या जागेसाठी टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतील. कोणत्याही अपक्ष उमेदवाराला शिवसेना सपोर्ट करणार नाही. दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच असतील." असा पुनरुच्चार सोमवारी बोलताना संजय राऊतांनी केला आहे. 
 
संभाजीराजेंची पुढची भूमिका काय?


शिवसेनेकडून देण्यात आलेल्या शिवसेना प्रवेशाच्या निमंत्रणाला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठ दाखवल्यानंतर संभाजीराजे यांची पुढील भूमिका काय असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस असल्याचं दिसून येतंय. राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचं पक्षाकडून आधीच जाहीर करण्यात आलं आहे. त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींना पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्यात आलं होतं. पण संभाजीराजेंनी पक्ष प्रवेशाला नकार दिल्याने शिवसेना आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.