पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून संभाजीराजे छत्रपतींची व्यवस्थितरित्या कोंडी करण्यात आली असल्याचा आरोप राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्रे फडणवीस यांनी केला आहे. हायकमांडने परवानगी दिली तर राज्यसभेची सहावी जागा आम्ही लढवू असंही ते म्हणाले.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी संभाजीराजेंना मतं देऊ असं जाहीर केलं. पण त्यांना माहिती होतं की ती जागा त्यांच्याकडे नाही. नंतर त्यांनी शिवसेनेला मते देणार असं सांगितलं.  शिवसेनेने त्यांना पक्षप्रवेशाची अट घातली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंचा फोनही उचलला नाही, माझादेखील फोन उचलला नव्हता. दरवेळी असंच घडतं. संभाजीराजेंची व्यवस्थितरित्या कोंडी करण्यात आली."


पंकजा मुंडे यांच्या नावाला पाठिंबा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हायकमांडने परवानगी दिली तर भाजप राज्यसभेची सहावी जागा लढवणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाला आमचा पाठिंबा आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्या आणि हायकमांड निर्णय घेतील. पंकजा मुंडे सर्व पदांसाठी पात्र आहेत, त्यांच्यात क्षमता आहे. 


आज शरद पवारांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवारांची देवावरची श्रद्धा वाढतेय हे चांगलं आहे. नेत्यांची श्रद्धा वाढली की लोकांचीही श्रद्धा वाढते. ही एक चांगली सुरवात आहे. 


राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार
शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता,असे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.


संभाजीराजेंना माघार घ्यावी लागली याचं मला दुःख वाटतं: पंकजा मुंडे
सर्वांनी मिळून संभाजीराजेंचा सन्मान करायला हवा होता, मात्र प्रत्येक पक्षाने आपला निर्णय घेतला आणि ज्यातून ते झालं त्याचं मला वाईट वाटत आहे असं म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीतून घेतलेल्या माघारीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं. नारायण गडावरच्या विकास कामाचा शुभारंभ झाल्यानंतर पंकजा मुंडे या माध्यमांशी बोलत होत्या.