सांगली : सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची नवीन संघटना काढली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा टवकाही निघणार नाही. असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यवर टीकास्त्र सोडलं.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नव्या संघटनेची स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकमेकांवर टीका करत आहेत.

एबीपी माझाशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, ''स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एकसंघ आहे. एखादी नवीन शेतकरी संघटना स्थापन झाली, तरीही  स्वाभिमानीचा मात्र एक टवका देखील निघणार नाही, याची मला खात्री आहे.''

ते पुढे म्हणाले की, ''लोकसंख्येमध्ये निम्याहुन अधिक जर शेतकरी असतील, तर शेतकऱ्याच्या आठ-दहा संघटना स्थापन झाल्या, तर फारसा फरक पडत नाही. पण तरीही अशा नव्याने स्थापन होणाऱ्या संघटनेचं आपण स्वागतच करतो,'' असं सांगून सदाभाऊंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी यावेळी इतर शेतकरी संघटनांवरही निशाणा साधला. शेट्टी म्हणाले की, ''शेतकऱ्यांशी इमान कुणाचं आहे , शेतकऱ्यांशी निष्ठा कुणाशी आहे आणि शेतकरी कुणाच्या मागे आहे? याचा सर्वांनी अभ्यास केला, तर समजेल.''