कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.


मूठभर उद्योजकांसाठी देशातील शेतकऱ्यांना संपण्याचा केंद्र सरकारचं धोरण असून शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या GST विरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. ते कोल्हापुरात बोलत होते.

“केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्याविरोधात कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी ट्रॉली खरेदीवर 28 टक्के GST आकारण्यात येणार आहे, तर आलिशान मर्सिडीज कारवर 5 टक्के GST आकारण्यात येणार आहे. मूठभर उद्योजकांसाठी देशातील शेतकऱ्यांना संपवण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे” असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या GST विरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिलाय.

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

शेतात औषध फवारणी करताना 33 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा मृत्यू हा शासन आणि अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळं झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी शासन आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

चेंगराचेंगरीतील मृतांना 5 लाख, मग शेतकऱ्यांना 2 लाख का?

मुंबईतील रेल्वे पुलावरील झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृतांना 5 लाखांची मदत देण्यात आली. मात्र मृत शेतकऱ्याला 2 लाखांची मदत दिली. शेतकरी पण माणूस आहे. त्यामुळं  शेतकऱ्यांसाठी हा भेदभाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ऊस परिषद होणारच

28 ऑक्टोबरच्या 16 व्या ऊस परिषदेत जो दर ठरेल तो साखर कारखान्यांना द्यावा लागेल. या ऊस परिषदेला लाखोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतात. कोण नसल्याने ऊस परिषदेवर कोणताही परिणाम होत नाही. तसंच जोवर शेतकरी ऊस परिषदेला येतात तोपर्यंत ऊस परिषद सुरूच राहील असा म्हणत त्यांनी रघुनाथ पाटील यांचं नाव न घेता टोला लगावला.

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शासनाने केली असं स्वतः शासन म्हणतंय, पण प्रत्यशात मागील 4 दिवसांत एकही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे ही शेतकरी अपमान योजना आहे, असं शेट्टी म्हणाले.