Raju Shetti : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. यासाठी परदेशी अहवाल आणा किंवा आंतरदेशीय अहवाल आणा पण सातबारा कोरा करा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच शक्तीपीठ महामार्ग हा 2029 निवडणुकीमध्ये निधी उभा करण्यासाठी सुरु असलेला भ्रष्टाचार आहे, असे म्हणत नवीन शक्तीपीठ महामार्गालाही राजू शेट्टींनी विरोध दर्शवला आहे.
शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोधच
शेतकऱ्यांना सध्या जून महिन्याची वाट असून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी परदेशी अहवाल आणा किंवा आंतरदेशीय अहवाल ठाणा पण सातबारा कोरा करा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. कर्जमाफी वरील प्रवीण परदेशी यांच्या अहवालावर राजू शेट्टी यांनी खास शैलीत हा इशारा दिला आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवीन मार्गाची घोषणा केली आहे, पण या नवीन मार्गालाही आमचा विरोधच असून आम्ही जागा देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय मोजणी होणार नाही
शक्तीपीठ महामार्गासाठी एक लाख कोटीचे कर्ज महाराष्ट्रावर येणार असून याचा खर्च फक्त चाळीस हजार कोटी आहे. वरचे साठ हजार कोटी रुपये हे 2029 च्या निवडणुकांसाठी निधी उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही राजू शेट्टी यांनी केला. आधीच महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचे कर्ज असून कोणाच्या निवडणूक निधीसाठी आम्ही हा महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. वास्तविक याच महामार्गाला नागपूररत्नागिरी हा दुसरा महामार्ग बनविण्यात आला आहे. या महामार्गावर केंद्र सरकारने प्रतिसाठ किलोमीटर टूल बसवले असून यातून रोज 40 लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित होते मात्र येथून रोज फक्त आठ ते नऊ लाख रुपये एवढा टोल मिळत असल्याने येथील वाहतूक केवळ पंचवीस टक्के एवढीच असल्याचे शेट्टी यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे पहिल्याच मार्गावरून वाहतूक नसताना शक्तीपीठ महामार्गाची गरज नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे. त्यामुळे संयुक्त मोजणीला अधिकारी आल्यास शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मोजणी होणार नसल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर भागातून झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाची संपूर्ण अलाइनमेंट बदलून नवीन मार्ग बनविला होता. मात्र आता राजू शेट्टी यांनी या मार्गासही विरोध करण्यास सुरुवात केली आहे.