Raju Shetti on Devendra Fadnavis: राज्याच्या कारागृह घोटाळ्यातील प्रमुख तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तेजस मोरेसोबत  सुपेकरांचे कनेक्शन असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारागृह घोटाळ्याच्या प्रकरणावर पांघरून घालत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. 

Continues below advertisement

कारागृहात तीन वर्षात जवळपास पाचशे कोटीचा घोटाळा 

राज्यातील कारागृहात तीन वर्षात जवळपास पाचशे कोटीचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव व गृह सचिव यांचेकडे सदर प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती. गत आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणावर भेटीसाठी वेळ मागितला असता त्यांनी भेट देण्यास टाळाटाळ केली. याबाबत राज्याचे मुख्य सचिव व गृह सचिव यांना भेटले असता चौकशी सुरू असल्याचे सांगून सध्या हे प्रकरण वरिष्ठ पातळींवर असल्याने आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करावा असे सांगण्यात आले. सध्या राज्याच्या प्रशासनात मुख्य सचिव यांच्यानंतर मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख व वरिष्ठ असून त्यांनी या घोटाळ्याची चौकशीबाबत टाळाटाळ करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे वाटू लागले आहे. 

5 मिनिट वेळ मागितली, तरीदेखील भेटले नाहीत

राजू शेट्टी म्हणाले की, कारागृहामधील 500 कोटीच्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यावर कारवाई होत नाही, संबंधित व्यक्तीला पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाली नाही. कारवाईचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाही, पण ते चालढकल करत आहेत. ते माध्यमांसमोर सांगत आहेत की पुरावे मिळाले तर कारवाई करणार, पण गेले दोन दिवस मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी मुंबईत कार्यालयबाहेर होतो. त्यांची पाच मिनिट वेळ मागितली, तरीदेखील भेटले नाहीत. 

Continues below advertisement

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांकडून अभय

यापूर्वीही बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, रायसोनी पतसंस्थेतील 1200 कोटीचा घोटाळा करणारे मुख्य संशयित आरोपी सुनिल झंवर, यांच्यासारख्या गंभीर गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या लोकांना अभय देत राज्याचे मुख्यमंत्री गैरकारभारावर पांघरून घालत आहेत. कारागृह घोटाळ्याची चौकशी करण्याची मुख्यमंत्री यांच्यामध्ये हिम्मत असेल तर तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर तसेच पुणे या कार्यालयातील  वरिष्ठ प्रशासन अधिकारी सत्यवान हिंगमिरे ,तुरूंग अधिक्षक प्रशांत मत्ते, जेलर शाहू विभूषण दराडे, लेखनिक गौरव जैन  ,सुनील ढमाळ अधीक्षक येरवडा, अतुल पट्टेकरी, क्लार्क येरवडा कारागृह या सर्वांची तसेच त्यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

तेजस मोरे याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल 

राजू शेट्टी यांनी सांगितले की, सदर प्रकरणाची गेल्या तीन महिन्यात सखोल चौकशी होणे गरजेचे होते. कारागृहात झालेल्या कँन्टीन, रेशन व इतर साहित्य उपकरणाच्या खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारागृह घोटाळ्यातील प्रमुख अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांच्याशी तेजस मोरेचे नाव सुपेकर यांच्यासोबत काढलेल्या फोटोवरून चर्चेत आले आहे. तेजस मोरे हा गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने मुंबई भायखळा येथील ADG कार्यालयात तसेच अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर  त्याचा संपर्क वाढलेला दिसून येत आहे. तेजस मोरे हा कोणताही अधिकारी नसून अथवा कोणताही ठेकेदार नसूनही  कारागृहातील वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून प्रशासनातील अनेक कामे मार्गी लावण्याचे काम करत असल्याचे समजते. तेजस मोरे याच्यावर याआधी 409, 420 सारखे फसवणुकीचे  अनेक गुन्हे दाखल झाले असतानाही सरकारचा जावई असल्यासारखा त्याचा  मंत्रालयात वावर असतो. ज्या मंत्रालयामध्ये प्रवेश करत असताना आमदार खासदार यांचे ओळखपत्र तपासले जाते त्या ठिकाणी तेजस मोरेच्या MH-01-EJ-2707 या त्याच्या गाडीला कोणतीही तपासणी व पाहणी न करता प्रवेश दिला जातो. 

इतर महत्वाच्या बातम्या